हिंगोली - जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भव्य आरोग्य शिबीर झाले. शिबिरासाठी मंत्र्यांचे दौरे निश्चित झाले असले तरी मंत्र्यांनी मात्र शिबिराला दांडी मारली. परंतु शिबिरात १९ प्रकारच्या विविध आजारांच्या जवळपास १ लाख ३९ हजार ४४४ एवढ्या रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तर वैद्यकीय तथा आरोग्यमंत्री गिरीश महाजन हे शिबिरास न आल्याने त्यांनी फोनवर दिलगिरी व्यक्त केल्याचे विषेश अधिकारी संदीप जाधव सांगितले.
मंत्र्यांचा दौरा निश्चित होऊनही ते न आल्याने शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांनीच टीमच्या कामाचे कौतुक केले. तर आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी टीमच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. विषेश म्हणजे शिबिराच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी टीमच्या पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतल्याने त्यांच्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.
शिबिरात १ लाख ३९ हजार रुग्णांची तपासणी
शिबीर रेल्वे विभागाच्या २५ हेक्टर जागेत घेण्यात आले होते. शिबिरासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणाहून आलेल्या डॉक्टरांनी सायंकाळी ४ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी केली. शिबिराच्या एक दिवस आधी ६७ हजार रुग्णांची नोंदणी झाली होती. शिबिराच्या ठिकाणीच नोंदणी करण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. रुग्णांना औषधीही मुबलक प्रमाणात मिळाली.
ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया केली जाणार आहे, त्यांना स्टिकर दिलेले आहेत. उद्या पासून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची शस्त्रक्रिया नोंद रजिस्टर मध्ये नोंदणी केली जाणार आहे. १५ दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेऊन, आजारनिहाय शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या रुग्णांचे वर्गीकरण केले जाणार आहे. रुग्णांच्या संख्येनुसार त्यांना शस्त्रक्रियासाठी रुग्णालयाचे नाव कळवून शस्त्रक्रियासाठी नेले जाईल. हा संपुर्ण खर्च प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केला जाणार आहे.
आजार निहाय तपासणी झालेल्या रुग्णांची संख्या
आयुष तपासणी- ८, ३००, जनरल सर्जरी-४,५००, प्लॉस्टिक सर्जरी-१००, कर्करोग-५००, लठ्ठपणा-४,५००, नेत्रतपासणी-१८,६००, मेंदूरोग-६,५००, श्वसनविकार-४,५००, वृद्ध जनरल-२२००, ह्रदयरोग-१३,०००, जनरल मेडिसिन-१५,०००, हाडांचे आजार-१४,४७४, त्वचा रोग-१४, १११, स्त्रीरोग-२५००, बालरोग-४,३००, कान, नाक, घसा-५,५००, मूत्ररोग- ६,५००, सिकलसेल, थायलेसिमिया-५०, मनोविकार-१,८००, दातांचे आजार-७, ४००, योग विभाग-३,५०० अशा एकूण १ लाख ३९ हजार रुग्णांची या शिबिरात तपासणी केली.