हिंगोली - शिवभोजन थाळीचे हिंगोली येथे महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्वतः भोजन वाटप केले. मात्र, पालकमंत्र्यासह अधिकारी, ताफ्यातील कोणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या या थाळीचा आस्वाद घेतला नाही. त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
गोरगरिबांना एक वेळचे तरी जेवण मिळावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या सरकारने मोठा गाजावाजा करत शिवभोजन थाळी सुरू केली. या थाळीत दोन पोळ्या, वरण, भात देण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात या थाळीचे उद्घाटन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वास्तविक पाहता मान्यवरांनी उद्घाटन केलेल्या शिवभोजन थाळीचा उद्घाटन करताना आस्वाद घेतला नाही. त्यामुळे हे भोजन नेमके स्वादिष्ट आहे की नाही, हे देखील कळू शकले नाही.
हेही वाचा - पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात प्लास्टिक मोहिमेचा फज्जा
हे भोजन घेण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असली तरीही उद्घाटनाच्या दिवशी या ठिकाणी कोणतेही कागदपत्र मागण्यात आले नव्हते.
थेट दहा रुपये घेऊन भोजन दिले जात असल्याचे पहावयास मिळाले. मात्र, लाभार्थ्यांनी या शिवभोजन थाळीबद्दल समाधान व्यक्त केले. हिंगोली येथे एकच केंद्र असून 200 थाळी वाटपाचे उद्दिष्ट आहे. दुपारी बारा ते दोन या वेळात ही थाळी वाटप केली जाणार आहे. तर ह्या थाळीचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रेही लागणार आहेत.
हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद