हिंगोली - संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध मागण्यासांठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हिंगोली येथील बस स्थानकातही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. विशेष म्हणजे, आंदोलन मागे न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे बडतर्फीची आदेश परिवहन मंत्री यांनी काढले आहे. ते आदेश घेऊन विभागीय नियंत्रक हिंगोली येथील बस स्थानकात दाखल झाले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.
हेही वाचा - धक्कादायक! फटाके उडवताना चिमुकल्याच्या डोळ्यात शिरला फटका, डोळा निकामी, हैदराबादला उपचार सुरु
गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्याच धर्तीवर त्यांनी दिवाळीच्या तोंडावर आपल्या मागण्या पूर्ण होतील ही अपेक्षा ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू केले आहे, मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे तर सोडाच, जे कर्मचारी आंदोलनामध्ये दाखल झाले आहेत त्यांच्यावरच कारवाईचा बडगा परिवहन मंत्र्यांनी उगारला आहे.
हिंगोली येथे देखील मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र, आज अचानक विभागीय नियंत्रक यांनी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केल्याचे आदेश आणल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. वास्तविक पाहता कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे, हे कर्मचारी मोठ्या पोटतिडकीने आंदोलन करीत आहेत. परंतु, त्यांच्या मागण्यांचा कोणताही विचार न करता त्यांच्यावरच करण्यात आलेल्या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे. आता या आदेशानंतर हे कर्मचारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - आमदाराने घोड्यावर चढून महाराजांच्या पुतळ्याला केला पुष्पहार अर्पण, नंतर व्यक्त केली दिलगिरी