हिंगोली - तापमान वाढीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हैराण झाला आहे. बुधवारी ४२ अंश आणि आज ४३ अंशावर तापमानाचा पारा चढल्याने हिंगोलीकर चांगलेच हैराण झाले होते. त्यामुळे ते जलतरणाचा आधार घेताना दिसत आहेत. तर दुपारच्या वेळी सर्वाधिक ऊन लागत असल्याने, बरेच जण घराबाहेर पडणे टाळत होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंशावर जाऊन पोहोचतो. मात्र, या वर्षी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जिह्याचे तापमान ४३ अंशावर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे हिंगोलीकर आज चांगलेच घामाघूम झाले. यावेळी शहरातील बऱ्याच पालकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी जलतरणाचा आधार घेतला.
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वाढत्या तापमानाने होरपळून निघत असतानाच जिल्ह्यातही सकाळी ९ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे गर्दीने नेहमीच भरून राहणाऱ्या रस्त्यावर मोठा शुकशुकाट दिसून आला. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी मात्र अनेकांनी रसवंती तसेच शीतपेयाच्या दुकानात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
जिल्ह्याला पाणीटंचाईचे ग्रहण
जस-जसे तापमान वाढत आहे, तस-तसे जिल्ह्यातील जलसाठे कोरडे पडत आहेत. त्यामुळे आज घडीला ३० ते ४० च्या वर गावांची भिस्त ही पाण्याच्या टँकरवर आहे. जिह्यातील बऱ्याच गावातील ग्रामस्थ पाणीटंचाईला कंटाळून गावे सोडून देण्याच्या तयारीत आहेत. तर टँकर सुरू असलेल्या गावात, महिला पुरुष टँकरच्या प्रतीक्षेत बसल्याचे भयंकर चित्र आहे.