हिंगोली - कोट्यवधी रुपयांची यंत्र सामुग्री आणि पुरेसे मनुष्यबळ असलेल्या लीडकॉम कंपनीतील उत्पादनाला शासनाचे पुरवठा दरपत्रच नाही. त्यामुळे येथील महागड्या मशीन सध्या धूळ खात पडून आहेत. तसेच उत्पादन देखील ठप्प झाले आहे. त्यामुळे ही कंपनी आता अच्छे दिन येण्याच्या प्रतीक्षेत आहे.
राज्यात अतिशय अद्यावत असे चर्मकार महामंडळाचे हिंगोलीत उत्पादन केंद्र आहे़. पीओ पोरींगसारखी एका दिवशी ४ हजार पादत्राणे उत्पादनाची क्षमता असणाऱ्या ४० कोटीची यंत्र सामुग्री याठिकाणी आहे. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे आज या उत्पादन केंद्रातील उत्पादने केवळ शासनाचे दरपत्रक नसल्याने ठप्प आहे. सरकार कौशल्य विकासाच्या माध्यमाने रोजगार क्षेत्रात अच्छे दिन आणत असले. तरी हिंगोलीत मात्र या लिडकॉमला अजून तरी अच्छे दिनाची प्रतीक्षा आहे.
राज्यात चर्मकार विकास महामंडळाचे चार ठिकाणी उत्पादन केंद्र असून त्यामध्ये हिंगोलीच्या लिडकॉममध्ये तब्बल ४० कोटी रुपयांची मशनरी उपलब्ध आहे. त्याचबरोबर कुशल कारागिरही आहेत. मात्र, शासनाचे दरपत्रक व मागणीसाठी प्रोत्साहनच मिळत नसल्याने येथील उत्पादनाचे केवळ नावापुरतेच उरलेय. वास्तवीक पाहता या यंत्राच्याच साहाय्याने या कंपनीत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ शकते. यातून महामंडळाला देखील कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
पूर्वी ऑक्सपर्ड, डर्बी बुटांची मागणी राहायची. राज्यात हिंगोली, दर्यापूर, कोल्हापूर, सातारा आदी चार ठिकाणी लिडकॉमची उत्पादन केंद्रे आहेत. येथून मोठ्या प्रमाणात मालही पाठविला जायचा. या उत्पादनाने ग्राहकांची विश्वासाहर्ता जपलेली असल्याने आजही ग्राहक या उत्पादनाला महत्व देतात. हिंगोली येथील उत्पादन केंद्रात ४० कोटी रुपयांची मशनरी असून अत्याधुनिक उत्पादन या मार्गाने करता येणे सहज शक्य आहे़. एवढेच नव्हे हिंगोलीत डिझाईनर असल्याने अलग अलग डिझाइनचे उत्पन्न घेता येते. या उत्पादन केंद्रातून महामंडळाच्या विक्री केंद्र व प्रदर्शनीसाठी पादत्राणे तयार केले जातात. पूर्वी हा कारखाना रात्रंदिवस चालायचा. सद्यस्थितीत या उत्पादन केंद्रात १४ कारागिर, ५ कर्मचारी, ३ सुरक्षा रक्षक, ८ कंत्राटी कर्मचारी, असे एकूण ३० कर्मचारी काम करतात.
या कारखान्याची तब्बल तीन एकर जागा आहे. औद्योगीक वसाहत भागात उत्पादन केंद्र असून येथील उत्पादन केंद्रातून नाविण्यपूर्ण चामडी वस्तूंची निर्मिर्ती केली जाते. यामध्ये कौशल्याने महिलांसाठी पर्स, सॅन्डल, चप्पल, विविध डिझाईनचे बूट, ट्रॅव्हल बॅग, कमरपट्टा, पिस्तुल कव्हर आदींसह अतिशय उत्कृष्ट डिझाईनच्या चामडी वस्तू तयार केल्या जात. मात्र, शासनाच्या माध्यमाने दरपत्रक नसल्याने या वस्तूंच्या निर्मितीला प्रतिसाद मिळत नाही़. शासनाने विविध शाळा, महाविद्यालयांसाठी लागणारे पादत्राणे, पोलीस, एसआरपीसारख्या जवानांना पादत्राणे यासह विविध साहित्य पुरवठा करण्यासाठी शासकीय आदेश दिल्यास या उत्पादन केंद्राला अच्छे दिन येतील. मात्र, शासनाची याबाबत कमालीची उदासिनता दिसून येत आहे.
चर्मकार महामंडळाचे धुळे, जळगाव, सोलापूर, नांदेड, बार्शी, बांद्रा येथे विक्री केंद्र असून या विक्री केंद्रावर हिंगोलीचे साहित्य विक्रीसाठी नेले जाते. तंत्रशुद्ध साहित्य निर्मिर्तीची क्षमता असूनही शासनाच्या उदासिनतेमुळे हिंगोलीच्या लिडकॉमधील उत्पादने अडचणीत सापडले आहेत.
रात्रंदिवस चालत होता कारखाना -
आता पुरवठा आदेशाची प्रतीक्षा असलेल्या हिंगोलीच्या लिडकॉममध्ये यापूर्वी रात्रंदिवस उत्पादन सुरू होते. यामधून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत होता. मात्र, सरकारने पुरवठा आदेश दिला नसल्याने आज या लिडकॉममध्ये उत्पादन ठप्प आहे़. या उत्पादन केंद्रात पीओ पोरींग मशिन असून मशिनसाठी आग्रा येथून तंत्रज्ञ आणलेले आहेत. मात्र, पुरवठा ऑर्डरच नसल्याने मोठी पंचायत निर्माण झाली.
...तर कुशल प्रशिक्षणाला चालना मिळेल -
चर्मकार समाजातील अकुशल कारागिरांना प्रशिक्षण देऊन नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करणे, चर्म वस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण करणे असे उपक्रम चर्मोद्योग विकास महामंडळ राबवण्याचे धोरण आखत आहे. मात्र, हिंगोलीत या चर्मकार महामंडळाच्या उत्पादन केंद्राला घरघर लागली आहे. जिल्ह्यातील अकुशल कारागिरांना प्रशिक्षण देऊन या ठिकाणच्या कोट्यवधींच्या मशनरीला पुनरूज्जीवीत करण्यासाठी प्रशिक्षणाबरोबरच शासनाची साथ मिळणे नितांत गरजेचे असल्याचे लिडकॉमचे व्यवस्थापक विलास बडगे यांनी सांगीतले. दुसरीकडे कोल्हापूर याठिकाणी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील पाच कंपनीने कुशल कामगार बनवण्यासाठी कंत्राट देखील दिले. मात्र, हिंगोली येथील उत्पादन केंद्रावर का दुर्लक्ष केले जाते? हे मात्र कळू शकले नाही.