हिंगोली - जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. गणेश विसर्जनाच्या एक दिवस अगोदर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तर, विसर्जनाच्या दुसर्याही दिवशीही मुसळधार पाऊस पडल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसाचा खरीप पिकांबरोबरच रब्बीच्या पिकांना ही चांगलाच फायदा होईल असे शेतकरी सांगत आहेत.
गणरायाचे आगमन झाल्यानंतर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तसेच गणेश उत्सव काळात अधून मधून पाऊस सुरूच होता. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत होते. मात्र, दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे उघडले आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून शुक्रवारी पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नदीच्या आणि तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या सोयाबीनसह इतर खरीप पिकांच्या शेंगा परिपक्व होण्याच्या स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे हा पाऊस त्या शेंगा साठी लाभदायक ठरणार आहे. हा पाऊस रब्बी पिकासाठी देखील अतिमहत्त्वाचा ठरणार आहे. सध्या खरीपातील विविध पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून या पावसामुळे हा प्रादुर्भाव कमी होण्यासही मदत होणार आहे.
हे ही वाचा - हिंगोलीत कयाधू नदीवरील बंधाऱ्याला बसवणार स्वयंचलित दरवाजे
दुपारच्या वेळी पडलेल्या पावसामुळे अनेकजण पावसापासून बचाव करण्यासाठी सहारा शोधताना दिसून आले. तर, वाहतूक कमी झाल्याचे पहायला मिळाले. सध्या ग्रामीण भागातील तसेच जिल्ह्यातील विविध भागात रस्त्यांची कामे गतीने सुरू आहेत. मात्र, या पावसामुळे रस्त्यावर एवढा चिखल झाला आहे की, त्यातून वाहने काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. शिवाय अपघाताचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
हे ही वाचा - हिंगोलीत भाविकांची चिंतामणी विघ्नहर्ता गणपतीचा दर्शनासाठी अलोट गर्दी