हिंगोली- जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दुसऱ्या दिवशी टंचाईग्रस्त गावांना भेटी देण्यास सुरुवात केली. जयपूवाडी या गावाला भेट देऊन कांबळे यांनी पाणी टंचाईचा आढावा घेतला. ७०० लोकसंख्या असलेल्या जयपूवाडी येथे एक टँकरच्या तीन फेऱ्या आजपासूनच वाढविण्याच्या सूचना बीडीओंना दिल्या तर मालसेलू येथे देखील पाणी टंचाईचा आढावा घेत, त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना बीडीओंना दिल्या आहेत.
पालकमंत्री कांबळे यांनी पाण्याचा आढावा घेतला. सरकार, नागरिक आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी एकत्र मिळून टंचाईवर मात करण्याचे आवाहन पालकमंत्री कांबळे यांनी केले. यावेळी पाणीटंचाई बाबतीत ग्रामस्थांच्या संपूर्ण अडचणी पालकमंत्री कांबळे यांनी ऐकून घेतल्या. त्यावर मुख्यमंत्री पेयजल योजनेत गावात योजना मंजूर झाल्याचे ग्रामसेवक रोहित पाटील व अभियंता नागरगोजे यांनी सांगितले. या योजनेचे ताबडतोब एस्टिमेट करून वरिष्ठ स्तरावर पाठवून देण्याचे आदेश पालकमंत्री कांबळे यांनी अभियंता नागरगोजे यांना दिले. तर काही शेतकऱ्यांचे कर्ज झाली नसल्याचे सांगताच, याठिकाणी पालकमंत्री यावर जिल्हाधिकारी सोबत बोलणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थ पाणीटंचाई व्यतिरिक्त इतरही बाबी मांडण्याचा प्रयत्न करत होते मात्र पालकमंत्र्यांनी केवळ या बैठकीत टंचाई संदर्भातच बोला इतर दुसरे काही बोलू नका असे स्पष्ट शब्दात सुनावले.
स्वातंत्र्यानंतर पालकमंत्री पहिल्यांदाच मालसेलूत
हिंगोली जिल्ह्यातील मालसेलू येथे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी भेट देऊन गावातील सर्व समस्या जाणून घेतल्या. मालसेलू येथील राजेंद्र पाटील यांनी गावातील अडचणींचा पाढा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री यांच्याकडे केली. यावर कृषी संजीवनी नानाजी देशमुख या योजनेत गावाचा समावेश केला जाईल, तसेच गावात टँकर वाढून मिळेल आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश वनविभागाला देणार असल्याचे सांगत सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन कांबळे यांनी दिले.
राष्ट्रवादी दाखवणार होते काळे झेंडे
मालसेलू येथे अनेक समस्या असल्याने राष्ट्रवादीच्यावतीने पालकमंत्री कांबळे यांना काळे झेंडे दाखविणार होतो. मात्र, पहिल्यांदाच पालकमंत्री गावांमध्ये आले अन् आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी थेट पाटील यांच्यासोबत संपर्क साधल्याने काळे झेंडे पिशवीत ठेवल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्री कांबळे यांनी स्मितहास्य देऊन विरोध आवर्जून करावा, मात्र कामातून, असे सांगितले. तर पालकमंत्र्यांसमोर मांडलेल्या मागण्यांना येत्या आठ ते दहा दिवसात मंजुर न झाल्यास राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला. तर पालकमंत्र्यांच्या सोबत रुग्णवाहिका असल्याने एकच चर्चा होत होती.