हिंगोली - रात्री अपरात्री ढाब्यावर मुक्कामी थांबलेल्या ट्रक चालकाचे झोपेत मोबाइल पळवून त्याची विक्री करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 3 लाख 89 हजार रुपये किमतीचे मोबाइल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली आहे.
कैलास रमेश शिंदे (रा. वसमत), सुनील संजय खिल्लारे (रा. म्हातरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे मोबाइल चोरीमध्ये सराईत असून, रात्री-अपरात्री एखाद्या ढाब्यावर ट्रक थांबला असता, त्यावर पाळत ठेवून त्यातील चालक झोपी गेल्याची खात्री करून, चालकाचे महागडे मोबाइल चोरी करत असत. नंतर ते स्वतःचे असल्याचे सांगत विक्री करायचे. त्यांच्या या प्रकाराने अनेक ट्रक चालक हे चांगलेच वैतागले होते.
असा झाला उलगडा
जिल्ह्यात मोबाइल चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेक ट्रक चालक हे चांगलेच वैतागले होते. मागीलवर्षी ओंढा नागनाथ ते नांदेड रोडवरील ढाब्यावर मुकामी थांबलेल्या ट्रकमधील चालक झोपी गेल्यानंतर मोबाइल चोरी करत असे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कैलास शिंदे, सुनील खिल्लारे या दोघांना ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता त्यांच्याकडे महागडे मोबाइल आढळून आले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.