हिंगोली - सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने ३३ कोटी वृक्ष लागवडीची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, यंदाही जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे रोपे जगविण्याचे या वनीकरण विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये असलेल्या रोपांना जिवंत ठेवण्यासाठी टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. तर काही रोपवाटिकेत रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला मजुरांना ऐन उन्हाळ्यात हाताला काम उपलब्ध झाल्याने महिला मजुरांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्ष लागवड करण्यात आली. यंदा विभागाने ३३ कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. महाराष्ट्रात वृक्षांची संख्या वाढवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, विविध योजनेंतर्गत लाखोंच्या संख्येने वृक्ष लावगड केली जात आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे सर्वच अधिकारी-कर्मचारी उन्हातान्हाची जराही पर्वा न करता रोपे तयार करण्याच्या कामात मग्न आहेत. तर सामाजिक वनीकरण अधिकारी मनीषा पाटील या उपलब्ध असलेल्या रोपांचा सद्यस्थिती जाणून घेत आहेत.
प्रत्येक तालुक्यात रोपे तयार करण्याचे काम सुरू -
प्रत्येक रोपवाटिकेत एक ते दीड लाखापर्यंत रोपे लावगडी योग्य आल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाने दिली. जोरताळा, ब्राह्मवाडा, लिंगदरी, चिंचोली सायाळा, पेडगाव वाडी आणि हिंगोली येथे अशा एकूण ७ रोपवाटिकेत रोपे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोबतच विभागाच्यावतीने सेवकापासून इतर कर्मचाऱ्यावर रोपे तयार करण्यासह रोपे जगविण्याची जबाबदारी दिली आहे. सेनगाव तालुक्यातील ५ शेतकऱ्यांकडेदेखील उपलब्ध असलेल्या रोपवाटिकेत रोपे तयार केली जात आहेत. प्रत्येक तालुक्यात रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्याला तिप्पटीचे उद्दिष्ट -
रोपे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना सामाजिक वनीकरण विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. एवढेच नव्हे तर जागेचे भाडेदेखील दिले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी मालामाल झाले आहेत. तर जिल्ह्याला तिपटीने उद्दिष्ट वाढून आल्यामुळे प्रत्येक विभागाला या वर्षी झाडे लावण्याचे वाढीव उद्दिष्ट मिळण्याची शक्यता आहे. परिणामी हिंगोली जिल्ह्यात वृक्षांची संख्या लाखोंच्या संख्येने वाढण्यास मदत मिळणार आहे.