हिंगोली - जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने, शेतकरी निसर्गासमोर हतबल झाला आहे. यावर्षी तरी मागील वर्षाची उणीव भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र यंदाही निसर्गाने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणीच फेरले. जिल्ह्यात अद्याप जोरदार पाऊस न झाल्याने, शेतकरी आता पीक जगवण्यासाठी चक्क डोक्यावर पाणी वाहून आणत असल्याचे भयाण चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
केसापूर येथील विश्वनाथ शिंदे यांच्याकडे साडे तीन एकर शेती आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून होत असलेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतीतील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. यंदा तरी पाऊस साथ देईल या आशेवर शिंदे यांनी एकरभर झेंडूची लावगड केली. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे झेंडूची झाडे जगविण्याचा प्रश्न शिंदेंसमोर उभा राहिला आहे. विहीरही तळाला गेली असल्याने विहिरीतील थोडेफार पाणी एका टाकीत साठवून ठेवत, तेच पाणी डोक्यावर हंड्याच्या साह्याने वाहून नेले जाते. त्यानंतर मजुरांच्या सहाय्याने तांब्याने झेंडूच्या रोंपाना पाणी दिले जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात यावर्षी केवळ 12.93 टक्के पाऊस झाला. मागील वर्षी आत्तापर्यंत 35.23 टक्के पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. तर सोमवारी 19.41 मी मी सरासरी पाऊस झाला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत. अजूनही ट्रॅक्टरद्वारे पेरण्या सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. ज्यांनी पेरणी केली ते ही पश्चाताप करत आहेत तर न पेरणी केलेले देखील पश्चाताप करीत आहेत. तर शिंदेसारखे काही शेतकरी डोक्यावर हंडा वाहत तांब्याने झाडांना पाणी देवून पिके जगवण्यासाठीची धडपड करीत आहेत. हा देखील हंगाम हातचा जाण्याची भीती असल्याने, निदान सरकारने तरी शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करावी, अशी अपेक्षा शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.