हिंगोली - खरीपाच्या पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. मृगाच्या सरी बरसल्यानंतर शेतकरी बैलाच्याच साहाय्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून पेरणीचेही नियोजन करणार होते. मात्र, यंदा भीषण पाणीटंचाई अन् चारा टंचाई असल्याने बैलजोडी विकण्याची वेळ बळीराजावर आली आहे. त्यामुळे यंदाची पेरणी ही ट्रॅक्टरवर केली जाण्याची शक्यता आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस असल्यामुळे पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यंदा ही टंचाई जास्त जाणवत आहे. या भागातील सर्वच पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्यामुळे वन्य प्राण्यांची देखील पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती होत आहे. या पाणीटंचाईचा फटका हा केवळ माणसालाच जाणवत नाही तर असंख्य वन्यप्राण्यांनी देखील बसत आहे. अशाच परिस्थितीमध्ये पशुपालकांना तर आपले पशु जगविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी पाणी आणि चाऱ्याअभावी आपली जनावरे विकण्याची वेळ आली आहे.
मृगाच्या सरी बरसल्यानंतर याच बैलजोडीच्या साह्याने बळीराजा आपल्या शेतातील पेरणी आटोपणार होता, मात्र चारा अन पाणीटंचाईमुळे त्याचे हे स्वप्न पूर्णता धुळीस मिळणार आहे. आता याच बैल विक्रीतून तो खते आणि बी-बियाणांची व्यवस्था करणार आहे. अन् बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरच्यासाह्याने पेरणी आटोपणार आहे. बैल जोडीच्या किंमतीत ट्रॅक्टर घरपोच मिळत असल्याचे चित्र आहे. शेतीची सर्वच कामे आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने होत आहेत. त्यामुळे भीषण पाणीटंचाईत बैलांचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळेच शेतकरी बैल पाळण्यास अनुत्सुक झाला आहे.
तसेच पेरणी आटोपल्यानंतर कोळपणी करावी लागते, ती कोणाच्याही बैलजोडी रोजाने आणून करता येते, अशी परिस्थिती ग्रामीण भागात सुरू झाली. त्यामुळेच बळीराजा आपली लाडकी बैलजोडी थेट बाजारात विक्रीस आणत आहे. मात्र, या ठिकाणी मिळालेल्या कवडीमोल भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त होत आहे. डोळ्यासमोर दिसतोय तो चारा आणि पाणी टंचाईचा प्रश्न.. त्यामुळेच मिळेल त्या भावात बैलजोडी विक्री करण्याची वेळ आली आहे. पशुपालक केवळ गुरांनाच कंटाळले नाहीत, तर शेळ्यांना देखील कंटाळले आहेत. एवढी भीषण परिस्थिती हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. मिळेल त्या भावात शेळ्यांची विक्री करीत असल्याचे चित्र हिंगोलीच्या बाजारात पहावयास मिळत आहे.