हिंगोली - आज सर्वत्र धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. मात्र, हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे ढाब्यावर दारूच्या नशेत तर्र होऊन मारहाण केल्याची घटना घडली. हॉटेलच्या वेटरने आरडाओरड केल्यानंतर हॉटेल मालकाने त्यांच्याकडे धाव घेऊन नशेत असलेल्या युवकांना हॉटेल बाहेर जाण्यासाठी सांगितले. याच रागातून युवकांनी ढाब्याच्या बाहेर राडा करीत दुचाकींची तोडफोड केली. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालय तसेच वाशिम येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
हेही वाचा - शॅडो मंत्रिमंडळ : मनसेच्या नव्या भूमिकेला जनतेचा कसा प्रतिसाद?
कनेरगाव नाका येथे पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका ढाब्यात काही युवक दारू पिऊन ढाब्यात आले. ते ढाबा चालकाला चहाची मागणी करीत होते. मात्र, चहा नसल्याचे ढाबा चालक त्याना सांगत होता. तरी देखील ते अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगितले असता त्यांना राग आला. त्यांनी लागलीच आरडाओरड करून परिसरात राडा केला. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तर रस्त्यावरील काही दुचाकींची ही तोडफोड करण्यात आली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमींना वाशिम येथील जिल्हासामान्य रुग्णालयात हलविले, तर घटनास्थळी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांने धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला. अद्यापही याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, धुलीवंदनाच्या दिवशी कनेरगाव नाका येथे राडा झाल्याने सणाला गालबोट लागले.
हेही वाचा - कमलनाथ मंत्रिमंडळाने दिला राजीनामा, लवकरच नवीन कॅबिनेट होणार स्थापन ..