हिंगोली - जिल्ह्यातील हत्ता नाईक तांडा येथे असलेल्या गोशाळेतील गाईंची चारा अन् पाण्याअभावी दैनावस्था झाली आहे. या गोशाळेत कत्तलीकडे जाणाऱ्या गाईंना वाचवून या ठिकाणी आणून सोडले जाते. मात्र, त्यानंतर त्यांची काळजी घेतली जात नाही. गोठ्यातील शेण न काढता त्यावरच गाईंना कोंबले जात असल्याचा प्रकार या गोशाळेत सुरू आहे.
सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक तांडा येथील गोशाळेत असलेल्या गुरांची संख्या शंभरावर आहे. गाईंच्या मलमूत्रापासून गोपालक साबण, फवारणी औषध बनविण्यात येते. मात्र, येथे असणाऱ्या गाईंची वेळेवर निगा राखत नसल्याने, हेळसांड होत आहे. गाईंसाठी परिसरात कुठेही मुबलक चारा उपलब्ध नाही, त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या गाई येथे मृत्यूशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत गाईने प्राण सोडलेच तर या मृत गाईंना रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त फेकून दिले जात असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात एकूण १२ गोशाळा असून, हत्ता नाईक तांडा येथील गोशाळा ही एकमेव अनुदानित शाळा आहे. एकीकडे संपूर्ण देशात गोहत्येवर बंदी असताना, गायीचे रक्षण करणाऱ्या गोशाळेतच गाईंची दैनावस्था आहे. या गोशाळेला आतापर्यंत २५- २५ हजारांचे ३ हप्ते प्राप्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त एल. एस. पवार यांनी दिली. या गोशाळेचा कारभार वरीष्ठ स्थरावर सुरू असल्याने आम्हाला तेथील काहीही कल्पना नाही. सर्वसामान्यांप्रमाणेच आमचा विभाग त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे, असेही पवार यांनी सांगितले. तर, गाईंचे या गोशाळेमध्ये संवर्धन व्हावे या उद्देशाने शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यानंतरही गाईंची दुर्दशा होत असून शासनाचा निधी नेमका जातोय कुठे? हा सवाल उपस्थित होत आहे.
हेही वाचा - पतीने सोडल्या नंतरही 'ती' नाही खचली, शेतातील 'सालगडी' बनून सांभाळते आईसह संसाराचा गाडा
गोशाळेचे संचालक याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचेही प्रकर्षाने समोर आले आहे. दरम्यान, अनुदान मिळाल्यानंतर गायराणातील गोशाळा हलवून गावालगत असलेल्या चालकांच्या शेतात गोशाळांचे शेड उभारण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी देखील अतीशय कमी जागा असून येथील गुरांचीही भयंकर दुरावस्था होत आहे.
हेही वाचा - हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी रुपाली पाटील गोरेगावकर बिनविरोध