हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या संचारबंदीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. हिंगोलीतल्या गिरगाव परिसर हा फळबागासाठी प्रसिद्ध आहे. या भागात प्रामुख्याने केळी, टरबूज, काशीफळ, असे अनेक प्रकारचे फळपीक घेतले जातात. गिरगाव येथे आज घडीला केळीची 100 हेक्टरवर लावगड आहे. मात्र, संचार बंदीमुळे व्यापारी केळीच्या माल खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद असल्याने गिरगाव येथील शेतकरी अरुण नादरे पाटील यांचा 8 हजार रोपाच्या मळ्याचे नुकसान झाले आहे. 8 हजार रोपांपैकी फक्त दीड हजार केळीच्या घडांची विक्री झाली आहे. अरुण नादरे या शेतकऱ्याचे जवळपास सोळा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जीवनावश्यक वस्तूमध्ये फळांचा समावेश असूनही त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले. आज गिरगावातील प्रत्येक केळी लागवड केलेला शेतकरी हा आर्थिक विवेचनात व मानसिक तणावात आहे.
शेतकरी गजानन रायवाडे यांच्या 5 हजार केळी, सुभाष रायवाडे यांच्या 3 हजार, देविदास पाटील कराळे यांच्या 5 हजार केळी, गोविंदराव नादरे 2 हजार , नामदेव साखरे 4 हजार केळीचे उत्पादन घेतले आहे. मात्र, केळीच्या मालाचा उठावच नसल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
टरबूज, काशीफळ लागवड केलेल्या शेतकऱ्यांचीही हीच परिस्थिती आहे. मारोती नादरे यांचे 10 एकर टरबुज आहे. ज्ञानेश्वर, जेठनराव नादरे यांचीही 4 एकर टरबुजाची लागवड आहे. रायवाडी बंधू यांचे जवळपास 25 एकर टरबुजाची लागवड केलेली आहे. गंगाधर जेठनराव नादरे यांनी 5 एकर काशीफळची लागवड केली आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडत आहे. हातातोंडाशी आलेलं पीक आता कोरोना मुळे विकता येत नाही. त्यामुळे निदान नुकसानीचे पंचनामे करून, नुकसान भरपाई तरी द्यावी, अशी आर्त मागणी शेतकरी करीत आहेत.