हिंगोली - औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग मंगळवारी रात्रीपासून भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, मंदिरातील नित्य पूजा, कार्यलीन कामकाज आणि स्वच्छता सुरू राहणार आहे. तहसीलदार तथा मंदिर समितीचे अध्यक्ष पांडुरंग माचेवाड यांनी याबाबत माहिती दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे मंदिरातील भाविकांची गर्दी कमी झाली आहे. मंदिर प्रशासनच्यावतीने स्वछता आणि खबरदारी घेण्याच्या सूचना अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी अगोदरच दिल्या होत्या. या जीवघेण्या विषाणूमुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत.
हेही वाचा - 'सध्या रेल्वे, बस बंद नाहीत पण...'
कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार मंदिर मंगळवारी रात्रीपासून भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय विश्वस्त समितीला विचारात घेऊन संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांनी घेतला. यादरम्यान मंदिरातील पहाटे साडेपाचचे स्नान, दुपारी बारा वाजता असणारी महानैवेद्य आरती, दुपारी चार वाजता महादेवाला स्नान आणि रात्री आठच्या नंतरची शेज आरती अशा धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली आहे.