हिंगोली - जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे कृषीमंत्री दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हिवरा जाटू येथे उतरले. यावेळी मंत्र्यांचे पाय भरू नये म्हणून, रस्त्यापासून शेतापर्यंत आसन पट्टी टाकली. परंतू परिस्थितीचे गांभीर्य ओळखत मंत्र्यांनी थेट चिखल तुडवत सोयाबीनच्या शेतात जाऊन स्वतः सडकी सोयाबीनची झाडे उपटत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचे सांगितले. अजिबात काळजी करू नका, असे म्हणत धीर दिला. तर ओंढा येथून काही अंतरवर असलेल्या काठोडा चोंढी येथेही रस्त्यावर उभे आलेल्या शेतकऱ्यांचीही कृषीमंत्र्यांनी भेट घेतली. अन त्यांच्या ही व्यथा जाणून घेतल्या.
मंत्र्यांच्या पायास चिखल लागू नये म्हणून शेतकऱ्याने लढवली 'ही' शक्कल शेषराव उघडे (रा. हिवरा जाटू) असे कृषीमंत्री यांनी शेताला भेट दिलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. हिंगोली येथे जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर पाहणी दौर्याला सुरुवात केली असता हिवरा जाटू येथे रस्त्यालाच लागून असलेल्या उघडे यांच्या शेताजवळ मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा थांबला. शेतात पाहणी करण्यास उतरलेल्या ताफ्याचे पाय भरू नये म्हणून रस्त्यापासून, शेतापर्यंत चिखलावर आसन पट्टी अंथरण्यात आली होती. मात्र, कृषीमंत्री भुसे यांनी या पट्टीकडे दुर्लक्ष करून, थेट चिखल तुडवत शेत गाठले. अन् पाण्यामध्ये उभे असलेल्या सोयाबीनची झाडे उपटली. त्यानंतर उघडे या शेतकऱ्यांची व्यथा शांतपणे जाणून घेतली. परिस्थिती पुढे हतबल झालेले उघडे यांनी आतापर्यंत खरीपमध्ये झालेला खर्च सांगण्याचा प्रयत्न केला. तर सरकार हे तुमच्या पाठीशी असल्याचे सांगून अजिबात तुम्ही कळजी करू नका असा धीर कृषीमंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांना दिला.
या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पुढील प्रक्रिया तत्काळ राबवण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, खा. हेमंत पाटील, कळमनुरी विधानसभा आ. संतोष बांगर, हिंगोली विधानसभा आ. तान्हाजी मुटकुळे, जि. प. अध्यक्ष गणाजी बेले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिप सीईओ राधाबीनोद शर्मा यांच्यासह अधिकारी कर्मचारी व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.