हिंगोली - हिंगोलीतील खुशालनगर भागातील जवळा पळशी रस्त्यावरील देशी दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. अखेर आज (गुरुवारी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दुकान मालकावर कारवाई केली. ए. एस., पी. एस जयसवाल असे या दारुच्या दुकान मालकाचे नाव आहे.
दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांनी उपोषणार्थी महिलांची भेट घेत महिलांची कैफियत ऐकून घेतली होती आणि सबंधित देशी दारूच्या दुकानावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. एवढेच नव्हे तर हे दुकान बंद करण्यासाठी उभी बाटली, आडवी बाटली असे मतदान घेऊन मतदानानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही सावे यांनी सांगितले होते. दरम्यान, सदर दारु विक्रेता हा दारुबंदीच्या मतदानाच्या वेळी विविध वार्डातील तळीरामांना पैसे देऊन मते वळविण्याचा प्रयत्न करु शकतो. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवण्यासाठीही महिलांनी पालकमंत्री सावे यांच्याकडे मागणी केली होती. तरीही महिलांनी दोन दिवस उपोषण सुरुच ठेवले होते. तेव्हापासूनच पोलीस प्रशासन या देशी दारु दुकानावर बारकाईने नजर ठेवून होते. तर आज (गुरुवारी) सकाळी मात्र, या देशी दारुचा दुकान मालक शासनाने ठरवून दिलेल्या 8 ऐवजी 6 वाजता उघडून दारु विक्री करीत असल्याचे दिसून आले.
त्यानुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक जगदीश भांडारवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार बालाजी बोके, राजू ठाकूर, विठ्ठल काळे, आकाश टापरे, सावंत आणि ठाकरे यांनी कारवाई केली. कारवाईमुळे या भागातील स्थानिक महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
आज (गुरुवारी) केलेल्या कारवाईमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर या भागात सुरु असलेल्या देशी दारुमुळे दारुच्या नशेत तर असलेले तळीराम दोन्ही बाजूने आपलाच रस्ता असल्याचे हातवारे करुन चालत असल्याचे ही अनेकदा पाहावयास मिळाले आहे.