हिंगोली- कुठेही साप दिसला की अंगावर शहारे उभे राहतात. सापाला पाहताच अनेकजण भयभीत होतात. त्यात साप चावला तर भीतीनेच मृत्यू होईल अशी काहीशी परिस्थिती असते. अशात सापाला चावा घेण्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. मात्र, असाच काहीसा प्रकार कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात घडला आहे. ज्याची आता परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.
संजय कचरू खिलारे (वय 45), असे साप चावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात साप आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता. सापाला पकडण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये संजय यांनी मोठ्या हिंमतीने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सापाने संजय यांना दंश केला.
सापाने दंश केल्याने संतापलेल्या संजय यांनी सापाला चावा घेतला. त्याला पोत्यात भरले आणि बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल गेले. साप सोबत घेऊन आलेल्या व्यक्तीला पाहण्यासाठी रुग्णालयातही मोठी गर्दी जमली होती. डॉक्टरांनी खिल्लारे यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे रवाना केले आहे.
सापाने फक्त दंश केला असून विष सोडले नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यामुळे संजय यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. व्यक्ती सापाला चावला यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. मात्र, भीतीपोटी संजय खिलारे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.