हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील एका क्रिकेट खेळाडूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समजताच आईला मानसिक धक्का बसल्याने आईच्या अनुपस्थितीत मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नितीन भाऊराव जटाळे(वय 19) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नितीन हा औरंगाबाद येथे बीएस्सी प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्याने नितीन आपल्या गावी परतला. त्याने औरंगाबादला जाण्यासाठी एक दोनवेळा प्रयत्नही केला मात्र, कॉलेज बंद असल्याने कुटुंबियांनी त्याला जाऊ दिले नाही. त्यानंतर तो गावातच तयार केलेल्या दोस्ताना क्रिकेट क्लबचा सदस्य झाला. त्याला अभ्यासाची आवड असल्याने कधी-कधी तो उमदरा शिवारात असलेल्या शेतात थांबून अभ्यास करत असे. शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे शेतात गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्या मित्रांकडे देखील चौकशी करण्यात आली. सर्वांनी मिळून नितीनचा शोध घेण्यास सुरुवात केली.
नातेवाईकांनी शेतात जाऊन शोध घेतला असता नितीन हा झोपडीमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून नितीनचा मृतदेह बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नितीनच्या आत्महत्येचे कारण अद्याप उघडकीस आले नाही.
क्रिकेट प्रेमींमधून हळहळ व्यक्त -
अभ्यासामध्ये हुशार असलेला नितीन उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होता. तो कोणत्याही गोलंदाजाला षटकार मारत असे. त्यामुळे परिसरात त्याची चांगलीच ओळख निर्माण झाली होती. मात्र, अचानक ही घटना घडल्यामुळे एक जिगरबाज खेळाडू हा आपल्यातून निघून गेल्याची खंत परिसरातील क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केली.