हिंगोली - शहरात मागील काही दिवसापासून कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनस्तरावर हे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली शहरात पाच दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र या संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी शहरांमध्ये काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. पहिला दिवस असल्याने, शहरात पोलीस अधिकारी, कर्मचारी जागोजागी तैनात आहेत. मात्र नागरिकांना समजावून सांगता-सांगता पोलिसांच्या नाकी नऊ आले आहेत.
हिंगोली शहरात आता कोरोनाचे सामूहिक संक्रमण व्हायला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने, कोरोनाचा धोका वाढला आहे. त्या अनुषंगाने हिंगोली शहरात पाच दिवस संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत शहराच्या सर्वच सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. गतीला आलेल्या कामांना यामुळे पुन्हा ब्रेक मिळाला आहे. अगोदरच पावसाने शेतकरी हैराण झालेला असताना, या संचारबंदीमुळे अडचणीत सापडला आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागातून शहरात लोंढेच्या लोंढे येत असून, शहरातील अनेक जण दुचाकीवरून फिरत आहेत. पहिलाच दिवस असल्याने, प्रत्येकाला समजावून सांगता सांगता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत.
हुज्जत घालणाऱ्यावर सुरू आहे कारवाई
हुज्जत घालणाऱ्यावर पोलीस कारवाई करत आहेत. तर काही जण पोलिसांची नजर चुकवून सुसाट वेगाने पळत आहेत. शिवाय, रस्त्यावर जागो जागी फिरताना देखील बरेच जण दिसून येत आहेत. पहिला दिवस असल्याने की काय शहरात एवढी ढील दिली आहे. उद्यापासून कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.