हिंगोली - दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहेे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन व इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले होते. या प्रयत्नाला यश आले आहे.
जिल्ह्यात १३ केएल ऑक्सिजन आणि दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची चिंता मिटली आहे. दोन्ही बाबी आता हिंगोली जिल्ह्यात दाखल झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांंसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात आज घडीला ३४० कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही 13 हजारावर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णांसाठी इंजेक्शन तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या काळजाचे ठोके वाढत होते. तर नातेवाइकांची देखील तारांबळ उडाली होती. मात्र, रुग्णांची गैरसोय न होऊ देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कर्नाटकमधून ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. सोबतच रेमडेसिविर इंजेक्शनदेखील उपलब्ध झाले आहेत. पालकमंत्री वर्षा गायकवाड, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन व इंजेक्शन उपलब्ध झाले आहे.
नियमित लागतोय 3 केएल ऑक्सिजन -
जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी हिंगोली येथे दोन तर वसमत आणि कळमनुरी येथेही ऑक्सिजन टैंक उभारलेले आहेत. त्याची क्षमता 13 केएल इतकी आहे. जिल्ह्यात दिवसाकाठी तीन केएल एवढा ऑक्सिजन लागत आहे. रुग्ण वाढत असल्याने मात्र जिल्ह्यात चिंता वाढली आहे. त्या अनुषंगाने प्रशासन खुपच गतीने कामाला लागले आहे. विना मास्क फिरणाऱ्याना दंड आकारला जात असून, रस्त्यावरच कोरोना चाचणी केली जात आहे. यात पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला थेट कोविड सेंटर येथे पाठविले जात आहे.