पणजी - गोव्यात बोगस मतदारांचा मुद्दा समोर आला आहे. गोव्याबाहेरून आलेल्या ८२० जणांची मतदार म्हणून एकाच निवासी पत्त्यावर नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी गोव्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. बेकायदा मतदारांविरोधात पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचेही खंवटे यांनी सांगितले.
आल्तीनो-पणजी येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मंत्री रोहन खंवटे यांनी निवडणूक अधिकारी कुणाल यांची आज दुपारी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बोलताना मंत्री खंवटे म्हणाले, एकट्या पर्वरी मतदारसंघात तीन पंचायती आणि साळगावच्या काही भागातील मतदारांचा समावेश होतो. मात्र, याच मतदार संघात एकाच पत्त्यावर ८२० जणांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. हे मतदार ईशान्य भारत आणि नेपाळमधील आहेत. त्यांच्याकडे अधिवासाचा कोणताही पुरावा नाही. लोकशाहीसाठी ही बाब घातक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ते सर्व कामगार कॅसिनोमध्ये काम करत असल्याची माहिती खंवटे यांनी दिली. त्यांच्या मतदार नोंदणीला आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर आज सकाळी ते कामगार म्हापसा येथील तहसीलदार कार्यालयात नावे काढून घेण्यासाठी गेले होते. तेथील व्यवस्थापनाच्या सांगण्यावरून आपण येथे आलो आहोत, असे कामगारांनी सांगितले.निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी करून मंगळवारपर्यंत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. अशीच परिस्थिती गोव्याच्या अन्य भागांतही असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
मग लोकशाहीला काय अर्थ-
आवश्यक ते पुरावे असलेली व्यक्ती मतदार म्हणून निश्चित नोंद करू शकते. परंतु, अशा प्रकारे मतदार नोंदणी झाली तर लोकशाहीला काय अर्थ राहणार आहे, असा सवालही खंवाटे यांनी उपस्थित केला. त्यांनी २८ मार्च रोजी बेकायदा मतदारांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. राज्य सरकार विविध कॅसिनोला वारंवार मुदत वाढ देत आहे. सरकार बनविताना एक कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार सरकार पुढे जात राहील, असेही ते म्हणाले.