पणजी - अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी पेडणे पोलिसांनी ४ रशियन नागरिकांना दांडोसवाडा-मांद्रे (ता. पेडणे) येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ७ लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी एटीएम मशीन फोडून ९ लाखाची चोरी केल्याचे कबूल कले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी दिली.
पेडणे पोलिसांना मिळाळेल्या माहितीनुसार शुक्रवारी दांडोसवाडा-मांद्रे येथे एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. तेथे एकजण भाडोत्री घरात गांजाची रोपे वाढवत होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अन्य एका घरात छापा टाकला असता तेथे तिघेजण अन्य प्रकारच्या अंमलीपदार्थासह सापडले. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत बाजारपेठेत सुमारे ७ लाख रूपये आहे. यावेळी रेडिक वेफिन (३५), एवजेनी जखरीन (३८), इगोर मार्कोव्हा (३२) आणि एलिया अलेक्झांडरोवीच (३०) अशी अटक केलेल्या रशियन नागरिकांची नावे आहेत.
या संशयितांनी वापरलेली स्विफ्ट कार (जीए-०३-डब्लू-५६६६) शोधून ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये दरोड्यासाठीचे साहित्य आढळून आले. यामध्ये लॅपटॅाप, एलपीजी गॅस सिलिंडर, गॅस कटर, हँडग्लोज, सेफ्टी फ्युज, ब्लॅक स्प्रे, वायर, बँटरी, प्लास्टिक पाइप्स, होकायंत्र, मास्क, गाडीच्या दोन नंबर प्लेट्स आदी अनेक वस्तू आढळून आल्या आहेत. हे सर्व जप्त साहित्य जप्त करण्यात आले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेले सर्व संशयित मागील २ महिन्यांपासून गोव्यात पर्यटन व्हिसा घेऊन राहत आहेत. त्यांच्याकडे व्हिसा आणि कागदपत्रे आहेत. मात्र, त्यांनी 'सी' फॉर्म भरलेला नाही, असे सांगून चौधरी म्हणाल्या, ते यापूर्वी भारतात आले होते का? याची चौकशी सुरू आहे. ते ज्याठिकाणी राहून हे सर्व करत होते ते एक छोटेसे घर आहे. परंतु, पोलिसांना संशय येऊ नये म्हणून सातत्याने ते घर बदलत होते. त्या आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
अटक केलेल्या टोळीने मधलावाडा-हरमल येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून ९ लाख ६ हजार १०० रुपये चोरीची कबुली दिली आहे. या प्रकरणी पेडणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही चौधरी यांनी सांगितले.
ही कारवाई पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर, पोलीस उपनिरीक्षक अनंत गावकर, सागर धाटकर, प्रफुल्ल गिरी, पराग पारेख, म्हापसा विभागीय पोलीस अधीक्षक सेराफिन डायस, पोलीस काँन्स्टेबल स्वप्नील शिरोडकर, रूपेश कोरगावकर, अनंत भाइडकर, लक्ष्मण नाईक, सदाशिव परब, आशिष परब, देविदास माळकर, गुरुदास मांद्रेकर, निखिल गवस, विनोद पेडणेकर, शैलेश पार्सेकर, किरण परब, स्वाती हळर्णकर, दीपा विरोडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.