गोंदिया - खोट्या नियुक्ती पत्राच्या आधारे वनविभागात नोकरी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका अज्ञात आरोपीने अमरावती येथील एका तरूणाला वन विभागात नोकरीचे नियुक्ती पत्र दिले होते. गोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज यांची स्वाक्षरी त्या बोगस पत्रावर होती. ही बाब लक्षात येताच उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर येथील अधिकाऱ्यांनी खोटे पत्र गोंदियाचे उपवनसंरक्षक युवराज यांच्याकडे पाठवून यासंदर्भात तक्रार करायला सांगितले. अमरावतीच्या तरूणाकडून पैसे घेऊन त्याला नोकरीचे बोगस पत्र देण्यात आले. युवराज यांच्या नावाचा व त्यांच्या बनावटी स्वाक्षरीचा गैरवापर करून बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले होते. अशाप्रकारचे पत्र आणखी किती लोकांना दिले आहे. तसेच बनावट नियुक्तीपत्राच्या आधारे आरोपीने अनेक लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.
अज्ञात आरोपीविरुद्ध गोंदिया येथील रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४६९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.