गोंदिया - जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत दोन दिवसांपूर्वी एका चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 22 मे) उघडकीस आली आहे. पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा, आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. राजकुमार अभयकुमार (वय 30 वर्षे, रा. कुंभारटोली), असे मृताचे नाव आहे.
23 मेपर्यंत सुनावली होती पोलीस कोठडी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी आमगाव येथील एका शाळेतील एलएफडी टीव्ही, 2 लाकडी कॅरम बोर्ड, 1 संगणक मॉनिटर, 1 सीपीयू, 1 म्युझिक सिस्टम, असा एकूण 48 हजर रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला. या चोरी प्रकरणी चार आरोपींना अटक केली होती. यात मुख्य आरोपी राजकुमार अभयकुमार त्याच्यासह सुरेश धनराज राऊत, राजकुमार गोपीचंद मरकाम आणि एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या सज्ञान तीन आरोपींना न्यायालयाने 23 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली होती.
शहरात तणावाचे वातावरण
आज (दि. 22 मे) पहाटेच्या सुमारास राजकुमारची प्रकृती बिघडली. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. राजकुमारचा मृत्यू पोलीस कोठडीतील मारहाणीमुळे झाल्याचा आरोप राजकुमारच्या कुटुंबियांनी केला आहे. राजकुमार याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे परिसरात गोंधळ घातला. त्यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष पोलीस दलाची तुकडी घटनास्थळी दाखल करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष
याबाबत आमदारांना कळल्यानंतर आमदार कोरोटे यांनी जोपर्यंत आरोपी पोलिसांना निलंबित करणात येणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच मृताच्या बहिणीने वडील आणि काका यांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - जिल्हा परिषद शाळेत 2 वेळा चोरी करणार्या 4 आरोपींना अटक