गोंदिया - गोंदिया पोलीस विभागातर्फे प्रथमच जिल्ह्यातील म्हैसुली या अतिदुर्गम नक्षल भागात राहणाऱ्या आदिवासी व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या गावातील महिलांना साडी व पुरुषांना धोतरचे वाटप तसेच गावजेवण देण्यात आले.
देवरी तालुक्यातीळ चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम नक्षल भागातील म्हैसुली गावात गोंदिया पोलीस विभागातर्फे पहिल्यांदाच गावातील आदिवासी तसेच इतर गावातील लोकांसाठी आरोग्य तपासणीचे कार्यक्रम पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. या शिबिरात म्हैसुली गावातील लोकांनी याचा लाभ घेतला. या शिबिराला गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरीश बैजल व त्यांच्या पत्नीही उपस्थित होते. गावातील नागरिक व आदिवासी नागरिकांनी आदिवासी नृत्य करुन त्यांचे स्वागत केले. या आरोग्य शिबीरात बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आदी रोगांचे तज्ज्ञ उपस्थित होते. या गावातील नागरिकांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. महिला डॉक्टरही शिबिराला उपस्थित असल्याने गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
या शिबिरामध्ये गावातील साडेतीनशे महिलांसाठी तर ५० वयोवृद्ध पुरुषांसाठी धोतर व कपड्याचे वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिरासाठी नागपूर व गोंदिया महाविद्यालयाच्या डॉक्टरांची टीम उपस्थित होती. तसेच म्हैसुली गावातील नागरिकांबरोबर परिसरातील नागरिकांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली.