गोंदिया - जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून जात असलेल्या रेल्वेमार्गावर रेल्वेच्या धडकेत एक वर्षाच्या वाघाचा मृत्यू झाला. गोरेगाव वनपरीक्षेत्रात सोमवारी (८ मार्च) सकाळी ही घटना समोर आली. नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील टी-१४ वाघिणीच्या तीन बछड्यांमधील हा एक वाघ आहे. वाघ रेल्वे रूळ ओलांडत असताना ही घटना घडली. रेल्वेची मालगाडी ही बल्लारशाकडून गोंदियाच्या दिशेने येत होती.
बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर पिंडकेपार गोंगले येथील पोल क्रमांक १०१५ च्या जवळ मालगाडीला धडकून या वाघाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षक कुलटाराज सिंह, एसीएफ आर. आर. सदगीर, नागझिरा अभयारण्याचे उपसंचालक पुनम पाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, गोरेगाव विभागाचे क्षेत्र सहायक धुर्वे, स्वप्निल दोनोडे हे घटनास्थळावर पोहोचले. घटनेचा पंचनामा करून वाघाचे शवविच्छेदन करून त्यावर अंतसंस्कार करण्यात आले. तीन दिवसांपूर्वीच गंगाझरी रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू झाला होता. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला सुरक्षेसाठी तारेची भिंत तयार करण्यात यावी, अशी मागणी वन्यप्रेमी करत आहेत.
वाघाचा एक पाय गायब -
रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या वाघाचा एक पाय तुटल्याचे पंचनाम्यात समोर आले. मात्र, वाघाचा तुटलेला पाय घटनास्थळावरून गायब आहे. गायब झालेल्या पायाचा शोध वनविभाग घेत असून जंगलात सर्च ऑपरेशन सुरू आहे.