गोंदिया - जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यांतर्गत येत असलेल्या कावराबांध येथील आरोग्य केंद्रात रुग्णांच्या जेवणाच्या थाळीत अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यावर रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत, या प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका हा नक्षलग्रस्तभाग असून कावराबांध हे परिसर अतिनक्षलग्रस्त व संवेदनशील असल्याने गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कावराबांध येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील रुग्ण औषध उपचारासाठी येत असतात. गंभीर आजाराच्या रुग्णांना रुग्णालयात भरती केले जाते. रुग्णांसाठी आरोग्य प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, हे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. कावराबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना देणाऱ्या जेवणात चक्क अळ्या आढळून आल्या. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र संपात व्यक्त केला आहे. निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असले तरी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
या आरोग्य केंद्रात मागील १० वर्षापासून एकच कंत्राटदार या केंद्रात जेवणाचा पुरवठा करत आहे. मात्र आज रुग्णांना जेवणाच्या थाळीत अळ्या आढळून आल्याने एकच खडबळ उडाली असल्याने याकडे या आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाने रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडलाय का, असाही प्रश्न निर्माण होत आहे.