गोंदिया - कोरोना आजार थांबवण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन आहे. या काळात नागरिकांना घराबाहेर निघू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे गोर-गरिबांच्या चुली पेटणे कठीण झाले आहे. बाहेर रोजगार नसल्याने पैसा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शासनस्तरावर महिलांच्या जनधन खात्यात प्रत्येक महिन्याला ५०० इतकी रक्कम जमा करण्यात येणार असे सांगण्यात आले. त्यानुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जनधन खाते असलेल्या महिलांच्या खात्यात ५०० रूपये शासनाकडून जमा करण्यात आले. मात्र, जनधन खात्यातील रक्कम परत जाणार, अशी अफवा समाज कंटकाकडून पसरविण्यात आली.
अफवेमुळे बँकेत चांगलीच गर्दी उसळली एकाएकी गर्दी वाढल्याने बँक कर्मचाऱ्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलीच दमछाक करावी लागली. कोरोना विषाणूची खबरदारी म्हणून, देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली. अशात अनेक कामधंदे बंद पडले. रोजंदारीवर कमवून जगणाऱ्या कुटुंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न चिघळला. यावर मदत म्हणून, अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत मदत करण्यात येत आहे. असे असले तरी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जनधन खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये इतकी रक्कम २ एप्रिल रोजीच बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे.
गर्दी टाळण्यासाठी बँकेच्या वेळापत्रकानुसार खातेदारांना रक्कम काढता येईल आणि बँकेत गर्दी करू नये, सुरक्षित अंतर नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. अशातच ५, ६ एप्रिलला सुट्टी असल्याने बँकेचे व्यवहार बंद होते. या दरम्यान काही समाजकंटकाने जनधन खात्यातील रक्कम परत जाणार आहे. अशी अफवा पसरविली. या अफवेने बँक परिसरात एकच गर्दी उसळली. यासोबतच कुणी संजय गांधी निराधार योजनेचे तर कुणी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे काढायला आले होते. यामुळे बँकेच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागून होत्या. भर उन्हात पैसे परत जाणार या अफवेने गर्दी केल्यामुळे सुरक्षित अंतर राखायचे कोणालाच भान राहिले नाही. वाढत्या गर्दीने बँक कर्मचारी आणि पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.