गोंदिया - सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या साकरीटोला येथे रुग्णावर उपचार करणाऱ्या बनावट डॉक्टरला सालेकसा पोलिसांच्या पथकाने 6 जुलैला अटक केली आहे. समीर रामलाल रॉय (रा. साखरीटोला), असे बोगस डॉक्टराचे नाव आहे. त्याच्या बोगस शस्त्रक्रियेमुळे दमयंती सुरजलाल धुर्वे (रा. मुरदोली) या तरुणीचा मृत्यू झाला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बोगस डॉ. रॉय अनेक वर्षांपासून या गावात फोडे व इतर आजाराने बाधित असणाऱ्या रुग्णांवर उपचार करत आहे. गाव परिसरातील रुग्ण त्याच्याकडे येत होते. रॉय हा रुग्णांना घरपोच सेवा देत होता. त्याने सुरुवातील डॉ. रॉय उल्लेख असलेल्या दवाखान्याचा लहानसा बोर्ड लावला होता. मात्र, नोंदणी क्रमांक स्पष्ट लिहलेला नव्हता. नंतर त्याने बोर्ड काढले. फोडे व जखम असलेले काही रुग्ण त्याच्याकडे उपचारासाठी येत होते. तो मुळचा पश्चिम बंगाल राज्यातील असून सध्या साखरीटोला येथे स्थायीक आहे.
वैद्यकीय परवाना नसताना केली शस्त्रक्रिया
मुरदोली येथील दमयंती सुरजलाल धुर्वे या तरुणीच्या डोक्यावर मागील काही दिवसांपासून गाठ झाली होती. ती काढण्यासाठी 23 जून, 2021 रोजी तिने साखरीटोला येथील समिर रॉय या बोगस डॉक्टराकडे उपचार घेतले. आरोपीकडे शस्त्रक्रिया करण्याचा परवाना नसतानाही त्याने चक्क तरुणीच्या डोक्यातील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर ती तरुणी सायंकाळी घरी जाऊन औषध घेतली असता तिला उलट्या झाल्या होत्या. त्यानंतर घरच्यांनी तिला 23 जूनला दमयंती भोवळ येत असल्याने तिच्या वडिलांनी रॉय याला सांगितले. मात्र, त्याने गॅसची समस्या आहे काही होत नाही, असे सांगून टाळले.
असा गेला तरुणीचा जीव
पण, दमयंतीची प्रकृती गंभीर होत गेली. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी तिला पुन्हा त्या बोगस डॉक्टराकडे नेले. त्यावेळी रॉयने तिला गोंदिया नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला 24 जूनच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना 26 जूनला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत मुलीच्या वडिलांनी डॉ. रॉय यांच्या विरोधात सालेकसा येथे तक्रार दिली होती. त्यावरुन सालेकसा पोलिसांनी बोगस डॉक्टर रॉय याला अटक केली आहे.
हेही वाचा - नक्षलवाद्यांना विस्फोटक, हत्यार पुरवठा करणाऱ्या ८ आरोपींना अटक