गोंदिया - दारुबाबत घरझडती घेण्यासाठी आपल्या अंमलदारसह गेलेल्या, महिला पोलीस उपनिरीक्षक राधा काशीनाथ लाटे यांना एका दारू विक्रेत्या कुटुंबातील तिघांनी संगनमत करून काठीने मारहाण केली. व शिवीगाळ देवून खोटे आरोप लावून फसवून टाकण्याची धमकी दिली. ही घटना तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रविदास वॉर्डात घडली. आरोपींमध्ये सूरज प्रकाश बरियेकर, पत्नी प्रिया सुरज बरियेकर व आई माया बरियेकर (रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा) यांचा समावेश आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करून काठीने मारहाण-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे या आपल्या पथकासह कायदेशीर रित्या दारुबाबत घरझडती घेण्यासाठी आरोपी सूरज यांच्या घरी गेल्या होत्या. शासकीय काम करीत असताना आरोपीच्या अवैध धंद्यावर कारवाई होवू नये, याकरिता आरोपीने आपली पत्नी प्रिया सुरज बरियेकर व आई माया बरियेकर यांना बोलावून महिला पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे यांना धक्काबुक्की करून काठीने मारले. तसेच शिवीगाळ देवून फसविण्याची धमकी दिली.
6 लाख 44 हजार 750 रुपये किंमतीचा माल जप्त-
त्यानंतर लाटे यांनी अधिक मनुष्यबळ बोलावून आरोपीची शासकीय पंचासमक्ष घरझडती घेतली. त्यात घरच्या तिसर्या माळ्यावर एकूण 800 पोत्यांमध्ये मोहफुलाचा सडके रसायन आढळले. प्रती पोती 10 किलो याप्रमाणे 8 हजार किलो मोहफुल रसायन, प्रती किलो 80 रुपये प्रमाणे 6 लाख 40 हजार रुपये किंमतीचा माल, 1 हजार रुपये किंमतीच्या दारू गाळण्याच्या दोन शेगड्या व 3750 रुपये किंमतीची 5 प्लास्टीकच्या दबकीत 75 लीटर दारू, असा एकूण 6 लाख 44 हजार 750 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
आरोपींना 1 दिवस पोलीस कोठडी-
पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम 353, 332, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील सदर तिन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर केल्यावर त्यांना 1 दिवस पोलीस कोठडी मिळालेली असुन तिन्ही आरोपीना न्यायालय कोठडी देण्यात आली. आरोपीना भंडारा येथे पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा- विधानसभा अध्यक्ष दिल्लीतून ठरवला जाईल - अस्लम शेख