गोंदिया - गोंदिया विधानसभेचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या घरासमोर १५ सप्टेंबरच्या रात्री साडेदहा वाजता सुमारास नगर परिषदेचे उपाध्यक्ष भाजपचे शिव शर्मा यांनी शिवीगाळ केली. या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून करण्यात आली होती. घटनेनंतर आरोपी शिव शर्मा हे फरार होते. शिव शर्मा यांचा शोध घेऊन गोंदिया शहर पोलिसांनी १९ सप्टेंबर रात्री नागपूर येथील एका हॉटेल परिसरातून अटक केली. २० सप्टेंबरला गोंदिया न्यायालयात हजर केले असता आरोपी शिव शर्मा यांना सायंकाळी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आमदार गोपालदास अग्रवाल २ वर्षांपूर्वी पत्रकार परिषद घेत असताना शिव शर्मा याने प्राणघातक हल्ला केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यातच १५ सप्टेंबरला आमदार अग्रवाल यांच्या घरासमोर सुरक्षेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी शिव शर्मा यांनी शिवीगाळ केली. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून शिव शर्मा विरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अटक होण्यापूर्वीच आरोपी शिव शर्माने पोबारा केला होता. गोंदिया शहर पोलीस आरोपींचा शोध घेत असताना मोबाईल क्रमांकावरून लोकेशन घेण्यात आली. दरम्यान, शिव शर्मा नागपूर येथे असल्याची खात्री झाल्यानंतर १९ सप्टेंबरला नागपुरातून रात्रीच्या सुमारास गणेशपेठ येथील एका हॉटेल परिसरात सापळा रचून आरोपी शिव शर्माला अटक करण्यात आली.
हेही वाचा - गोंदियामध्ये 2 हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत
२० सप्टेंबरला गोंदिया पोलीसांनी शिव शर्माला न्यायालयात हजर केले. दरम्यान न्यायालयाने सायंकाळी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपी शिव शर्मा याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हे प्रकरण किती तापणार? या प्रकरणात न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा यांना केव्हा जामीन मिळणार का? या बाबीची उत्कंठा गोंदिया शहरातील नागरिकांमध्ये दिसून येत आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत असल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेतही आहे.