गोंदिया - येथील प्लॅटफॉर्म न. १ वर रेल्वे पोलिसांना गस्त घालताना एक माणूस संशयास्पदरित्या आढळून आला. चौकशीअंती त्याच्याकडून ८ लाख ९० हजार ७५० रुपयाची रोकड जप्त करून ती आयकर विभागाच्या सुपूर्द करण्यात आली आहे.
रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिस रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालतात. १५ जूनला प्लॅटफॉर्म क्र.१ वर गस्त घालताना मेन गेट समोरील बुकिंग ऑफिस परिसरात एक माणूस संशयास्पद रित्या आढळला. त्याची चौकशी केली असता, त्याचे नाव राजकुमार उर्फ प्रफुलला देवांगन असून छत्तीसगढ राज्यातील रा. शंकरपूर राजनांदगाव गावाचे असल्याचे सांगितले. त्या पुरूषाकडील बॅगची चौकशी केली असता, त्यात १००, २००, ५००, २००० च्या नोटा आढळून आल्या. ही संपूर्ण रक्कम ८ लाख ९० हजार ७५० रुपये आढळली. या बाबत पोलीसांनी विचारले असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच आवश्यक पुरावेही सादर केले नाहीत. त्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी त्याला गोंदिया रेल्वे पोलिसांनी ठाण्यात हजर करण्यात आले. तेथेच पैशाची मोजणी करून याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली. ही कारवाई पोलीस अधिक्षक लोहमार्ग एम. राजकुमार, वैशाली शिंदे तसेच एस. व्ही शिंदे, यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी संदीप गोंदणे, पोउपनि प्रवीण भिमटे, मनोज गुप्ता, संजय नेवारे, किशोर ईशरकर, अरुण गोधोडे, अजय बर्वे, चंद्रकात भोयर, कुणाल गिरनातवार, धीरज घरडे, सुनीता मडावी यांनी पार पडली.
![९ लाख रुपयाची रोकड जप्त](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-16june21-cashseizedatrailwaystation-10040_16062021110459_1606f_1623821699_770.jpg)