गडचिरोली- दारू विक्रेत्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई होऊ नये, यासाठी आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील एक महिला पोलीस पाटील लाच मागत होती. या पोलीस पाटलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील आधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ज्योती विजयकुमार मेश्राम (वय.४५) असे अटक केलेल्या महिला पोलीस पाटलाचे नाव आहे.
तक्रारकर्ता हा दारूविक्रेता आहे. त्याचा दारूचा व्यवसाय सुरळीत राहू देण्यासाठी आणि त्याच्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई न होऊ देण्यासाठी पोलीस पाटील ज्योती मेश्राम हिने तक्रारकर्त्यास १ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ज्योती मेश्राम हिला तक्रारकर्त्याकडून १ हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. ज्योती मेश्राम हिच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- गडचिरोली-आष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात, धुळीने नागरिक हैराण