गडचिरोली - जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पुढाकारातून अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील असलेल्या कटेझरी गावात पोलीस दलातर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे कट्टेझरी गावातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट आता थांबली असून पोलीस विभागाच्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २९ मे रोजी कटेझरी गावाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या होत्या. यावेळी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि लहान मुला-मुलींना करावी लागणारी पायपीट लक्षात आणून दिली. याची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी अवघ्या १५ दिवसात गावात पाण्याची व्यवस्था करून दिली.
कटेझरी गावात गडचिरोली पोलीस दलातर्फे बोअरवेल खोदून देण्यात आला. गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी यासाठी बोअरवेलच्या बाजुला पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर नळजोडणी करून टाकीतून नळाद्वारे पाणी ग्रामस्थांच्या दारापर्यंत पोहचिविण्यात आले. शुक्रवारी (१४ जून) या योजनेचा शुभारंभ कटेझरी गावातील प्रतिष्ठित नागरिक भिमाजी कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस मदत केंद्र कटेझरीचे प्रभारी अधिकारी अक्षयकुमार गोरड, पोलीस उपनिरीक्षक सागर वरुटे, पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे व ग्रामस्थ हजर होते.