गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गेल्या ११ एप्रिलला मतदान पार पडले. मात्र, अतिदुर्गम असलेल्या एटापल्ली तालुक्यातील वाटेली, गरदेवाडा, पुष्पोटी, वांगेपुरी येथे निवडणूक कर्मचारी पोहचू शकले नाहीत. सुरक्षेच्या कारणामुळे या चारही बूथवर मतदान झाले नाही. त्यामुळे येथे येत्या १५ एप्रिलला सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले आहे.
मतदान काळात एटापल्ली तालुक्यातील कसनसुरजवळील मौजा वागेझरीजवळ आईडी ब्लास्ट झाला. एवढेच नाही तर गट्टा जांबीया आणि पुरसलगोंदी गावाजवळ झालेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात २ जवान जखमी झाले होते. त्यामुळे या ४ गावांत १५ एप्रिलला मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. चारही गावांचे मतदान गट्टा येथील जिल्हा परिषद शाळेत होणार आहे.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात यापूर्वी ११ एप्रिलला झालेल्या मतदानात ७२.०२ टक्के मतदान झाले. यामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ७२.८८ टक्के, आरमोरी विधानसभा क्षेत्रात ७३.८० टक्के, अहेरी विधानसभा क्षेत्रात ६७.२५ टक्के, आमगाव विधानसभा क्षेत्रात ६८.६८ टक्के, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ७५.२६ टक्के, तर चिमूर विधानसभा क्षेत्रात ७३.५९ टक्के मतदान झाले. मात्र, मतदान न झालेल्या ४ केंद्रांवर १५ एप्रिलला मतदान घेतल्यानंतर मतदानाची टक्केवारी आणखी वाढणार आहे.