गडचिरोली - बुधवारी सायंकाळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यात चामोर्शी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळल्याने दोघे जागीच ठार तर तिसऱ्या घटनेत एक बैल ठार झाला. रुपेश उपेन बाच्याड (वय 16) व भैय्याजी राघोबा मडावी (वय 42) अशी मृतांची नावे आहेत.
चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे शेतात काम करीत असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास रुपेश बाच्याड याच्या अंगावर वीज पडल्याने तो जागीच ठार झाला. तर दुसऱ्या घटनेत सोमनपूर येथे शेतात काम करीत असताना भैय्याजी राघोबा मडावी यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. तर या घटनेत जयश्री जोतिन आत्राम (32) ही महिला जखमी झाली. तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
तर तिसऱ्या घटनेत धर्मपुर येतील काशिनाथ दसरु आत्राम यांचे बैल शेतात चरत असताना वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांना व जखमींना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.