गडचिरोली - अहेरी येथील उपविभागीय कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर खत, बियाणे पुरवठा करण्यात येत आहे. आज अहेरी उपविभागीय कृषी कार्यालयाजवळ सदर खत पुरवठा गाडीला अहेरीचे पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी शासकीय दरात थेट बांधावर या गोष्टी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली अहेरी तालुक्यातील खाँदला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिरेपली येथील जय कूपार लींगो शेतकरी गटाला या वस्तू देण्यात आल्या. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश जगताप, तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. तालुक्याच्या दुर्गम भागात प्राधान्याने हंगाम पूर्व निविष्ठा पुरवठा करण्याचा हेतू असल्याचे यावेळी कांबळे यांनी सांगितले.
आज युरिया खताबरोबर, डी ए पी, 20:20:0, तसेच 18:18:10 या रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला. पंधरा शेतकऱ्यांच्या गटाने दोनशे पोती खत स्वतः वाहतूक करून नेले. यासाठी कृषी पर्यवेक्षक वाघमारे व कृषी सहाय्यक मार्गीया यांनी परिश्रम घेतले. या योजनेद्वारे वस्तूंचा वेळेत आणि रास्त दरात पुरवठा होत असल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.