गडचिरोली - जिल्ह्यात आरटीपीसीआर कोविड-19 लॅब लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. या उच्च दर्जाच्या लॅबमध्ये कोरोनाच्या नमुन्यांच्या तपासणीसोबत इतरही संसर्गजन्य आजारांसंबंधी तपासणी करता येईल. लॅबसाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध केला जाईल. लॅबच्या मंजुरीसाठी आरोग्य विभागाचे संचालक, अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
शेतकरी कर्ज मिळण्यास पात्र असूनही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील तर त्या बँकांवर कारवाई करण्यात येईल. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना सर्व बँकांना पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या पीककर्जाच्या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्ह्यामधील पहिल्या आणि दुसऱ्या यादीमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे. सध्या तिसरी यादी प्रतीक्षेत आहे आणि त्या यादीतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणारच आहे. कारण ते पात्र शेतकरी आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम सरकार करणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
व्यावसायिक तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी अत्यंत कमी कर्ज वाटप केल्याचे दिसून येत असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व बँकांनी कर्ज वाटप येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. कुठल्याही कागदपत्रासाठी शेतकऱ्याची अडवणूक होता कामा नये. फक्त चारच कागदपत्रे यामध्ये पासपोर्ट साइज फोटो, नमुना आठ, सातबारा आणि आधारकार्ड लागते. या व्यतिरीक्त कोणतेही कागदपत्र बँकांनी मागितल्यास शेतकऱ्यांनी तक्रार आमच्याकडे करावी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी, असे ते म्हणाले. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला आणि बँक अधिकारी उपस्थित होते.