गडचिरोली - गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे भाजप उमेदवार अशोक नेते अध्यक्ष असलेल्या शिवकृपा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी पैशांसाठी कुरखेडा येथील भाजप प्रचार कार्यालयात चांगलाच राडा केला. ऐन निवडणुकीच्या दिवसात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.
गडचिरोलीचे मावळते खासदार आणि भाजप उमेदवार अशोक नेते यांची शिवकृपा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था आहे. ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पतसंस्थेच्या शाखा आहेत. कुरखेडा येथील शाखेत लोकांनी अशोक नेते यांच्यावर विश्वास ठेवून पैसा जमा केला. मोठ्या प्रमाणात ही ठेव होती. मात्र, ही सोसायटी तोट्यात गेल्याचे समजल्यावर लोकांनी पैसे परत मागण्याचा सपाटा लावला. यासाठी ठेवीदारांनी यापूर्वी कुरखेडा येथील विश्रामगृहात नेते यांना घेरावही घातला होता.
पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ठेवीदारांमध्ये असंतोष वाढत गेला आणि काल मंगळवारी कुरखेडा येथील नेते यांच्या प्राचार कार्यालायावर ठेवीदारांनी हल्ला चढवला. सुमारे शंभरावर ठेवीदार कार्यालयात घुसले. महिलांनी ठाण मांडले. यावेळी अशोक नेते तेथे नव्हते. मात्र, उपस्थित असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना ठेवीदारांच्या रोषाचा सामना करावा लागला.
ऐन निवडणुकीच्या दिवसात अशोक नेते यांच्याविरोधात घडलेल्या या घटनेनं विरोधक सुखावले आहेत. लोकांच्या या असंतोषाचा व्हिडिओ आता मतदारसंघात चांगलाच व्हायरल होऊ झाला आहे. या पतसंस्थेचे गडचिरोली येथील किरायच्या घरात एका खोलीमध्ये मुख्य कार्यालय आहे. दरम्यान, यासंदर्भात अशोक नेते यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे सांगून मला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप केला. तर व्यवस्थापकांना विचारले असता, त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार देत, पतसंस्था अध्यक्षांशी बोला असे उत्तर दिले आहे.