गडचिरोली- जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नावीन्यपूर्ण योजना हाती घेतल्या जातात. पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र आलदंडी हद्दीतील परसलगोंदी गाव तलावात वर्षानुवर्षे उपसा न केलेला गाळ पोलीस दलाने उपसा करून दिला. आता तलावाचे चांगले खोलीकरण झाल्याने या भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत मिळणार असून मासेमारी व्यवसाय करण्यास चालना मिळणार आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या नेतृत्वात सीआरपीएफ १९१ बटालीयन सी कंपणीचे पोलीस निरीक्षक ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, संदेश नाळे, अमित पाटील, अजित मोरे, विनायक माहूरकर, सोपान मुंढे, महेश सातपुते, प्रभारी अधिकारी किरण मगदूम, गोपाल इंद्राळे, राहुल वानखेडे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपासून सतत श्रमदानातुन परसलगोंदी गावतलावाचे पोकलँड, जेसीबी, ट्रॅक्टरचे साहाय्याने उपसा करून खोलीकरण केले. तसेच तलावातील मुरुम परसलगोंदी गावातील अंतर्गत रोडवर टाकून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले.
तलावातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतामध्येही टाकल्यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळणार आहे. गाव तलावाचे पावसाळयापुर्वी खोलीकरण झाल्याने त्याचा लाभ पंचक्रोशीतील ग्रामस्थांना होणार आहे. त्याचबरोबर पाणी साठल्यानंतर गडचिरोली पोलीस दलातर्फे स्थानिक बांधवांना मत्स्यबीज उपलब्ध करून दिले जाणार आहे. मत्स्यशेतीच्या माध्यमातून या भागातील अनेक तरुणांना रोजगार मिळण्यास मदत मिळेल.
पाणी उपलब्ध झाल्याने कृषी क्षेत्राच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे. याच पध्दतीचा उपक्रम पावसाळयापूर्वी जिल्हाभरात राबविण्यात येणार असून मत्स्यशेतीतून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल प्रयत्न करणार आहे