गडचिरोली - लोकसभेसाठी गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-पिरिपा-आरपीआय-शेकाप-सीपीआय संयुक्त आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचे नामांकन शुक्रवारी दाखल करण्यात आले. यावेळी आघाडीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
काँग्रेसच्या उमेदवारीसाठी बरीच चढाओढ सुरू होती. मात्र, अखिल भारतीय काँग्रेसने गडचिरोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे २ गट प्रचंड नाराज झाले. काहींनी तर अपक्ष लढण्याचे जाहीर केले. यात विधानसभा उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी मागितलेल्या उमेदवारालाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे पक्षात गटबाजी आणखी तीव्र होऊन काँगेसने जाहीर केलेल्या उमेदवाराचा पराभव होईल असे, जाणकार बोलत होते. मात्र, उमेदवारी दाखल करताना कोणते पदाधिकारी उपस्थित राहतील याकडेही लक्ष होते.
उमेदवारी दाखल करण्यासाठी जिल्हाभरातुन कार्यकर्ते व पदाधिकारी गडचिरोलीत दाखल झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयापासून रॅली काढण्यात आली. या रॅलीत विधानसभा उपगटनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार आनंदराव गेडाम, अविनाश वारजूकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री बाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम, सतिश वारजूकर, ससुरेश पोरेड्डीवार, अतुल गण्यारपवार आदी उपस्थित होते.