गडचिरोली - येथील एसटी बस आगारातून सुटणारी वडसा बसगाडीने ट्रॅक्टरला धडक दिली. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास गडचिरोली एसटी आगारासमोर घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र बसचे मोठे नुकसान झाले आहे.
रस्त्याच्या कामामुळे घडतायेत अपघात -
गडचिरोली शहरात सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. एसटी बस आगार समोरील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक असल्याने वाहने हळू चालवावी लागतात. दरम्यान, धानोराकडून बांधकामाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला आगारातून निघालेल्या वडसा बस गाडीने वळण घेताना धडक दिली. यात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने बसमध्ये प्रवासी असतानाही कुणालाही इजा झाली नाही.
अपघातामुळे वाहतुकीची कोंडी -
बस आगारातून निघाली त्यावेळी वळण घेताना हा अपघात घडला. चालकाने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यामुळे पोलीस येऊन पंचनामा करेपर्यंत बस आणि ट्रॅक्टर घटनास्थळीच उभे होते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
बस चालकावर रोष -
आगारातून बस निघतांना राष्ट्रीय महामार्गावर वळण घ्यावे लागते. अशावेळी बसचालकाने हळू आणि चहूबाजूने लक्ष देऊन गाडी चालवणे गरजेचे आहे. मात्र सरळ मार्गाने ट्रॅक्टर जात असताना बसचालकाने बेजबाबदारपणे गाडी चालवून ट्रॅक्टरचा ट्रॉलीला मागून धडक दिली. ही घटना येथे उपस्थित अनेक नागरिकांनी बघितली.
मात्र एसटी आगारासमोरच ही घटना घडल्याने अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व ट्रॅक्टर चालकाकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचे बोलत होते. तेव्हा तेथे उपस्थित नागरिकांनी बसचालकाचा दोष आहे, असे सांगत रोष व्यक्त केला.
हेही वाचा- BREAKING: भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग ; अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल
हेही वाचा- प्रताप सरनाईक यांना तिसऱ्यांदा ईडीकडून समन्स; तर, चांदोलेच्या कोठडीसाठी हायकोर्टात धाव