ऑनलाईन परीक्षेत गोंडवाना विद्यापीठाची बाजी, 90 अभ्यासक्रमांचे अंतिम निकाल जाहीर - online exam
कोरोना महामारीमुळे यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. परंतु, सर्व्हर डाऊनमुळे अनेक विद्यापीठांकडून परीक्षांसाठी 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. मात्र दुसरीकडे गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने मात्र बाजी मारत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा आठ दिवसांमध्ये घेऊन, दोन दिवसांत 90 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत.
गडचिरोली - कोरोना महामारीमुळे यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. परंतु, सर्व्हर डाऊनमुळे अनेक विद्यापीठांकडून परीक्षांसाठी 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. मात्र दुसरीकडे गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने मात्र बाजी मारत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा आठ दिवसांमध्ये आटोपून, दोन दिवसांत 90 अभ्यासक्रमांचे अंतिम निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर बुधवारी सायंकाळी जाहीर केले.
एवढ्या कमी कालावधीत ऑनलाईन परीक्षा पार पाडून निकाल जाहीर करणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील बहुतेक पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. गोंडवाना विद्यापीठातर्फे 12 ऑक्टोबरपासून अंतिम वर्षाच्या परीक्षांना सुरुवात झाली होती. गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यातील संलग्न असलेल्या 212 महाविद्यालयांचे 18 हजार 500 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात इंटरनेट सेवेचा अभाव असतानाही गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने सर्व पेपर यशस्वीरित्या घेतले. तत्पूर्वी 5 ऑक्टोबरला गोंडवाना विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा होणार होती. मात्र पहिल्याच पेपरला इंटरनेटची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने, पेपर रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली होती.
नव्या वेळापत्रकानुसार 12 ऑक्टोबरपासून ऑनलाइन परीक्षेला सुरुवात झाली. 19 ऑक्टोबरला परिक्षा आटोपल्या. परीक्षेसाठी पात्र एकूण विद्यार्थ्यांपैकी 95.93 टक्के विद्यार्थी ऑनलाईन तर 4.7 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान 96 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यापीठाच्या योग्य नियोजनामुळे ऑनलाइन परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडून, दोन दिवसांत निकाल जाहीर करण्यात आम्ही यशस्वी ठरल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठ परिक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. अनिल चिताडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.