गडचिरोली - जिल्हा सीमेवर आलेल्या प्रत्येक मजुराला मोफत बसेसची व्यवस्था केली जात आहे. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितरित्या घराजवळ पोहोचण्यासाठी आम्ही कार्य करत असल्याची माहिती, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- COVID-19: मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे वैध समजली जाणार - केंद्रीय वाहतूक मंत्रालय
जिल्ह्यातील 16 हजार 800 मजूर जिल्ह्याबाहेर कामासाठी गेले होते. त्यापैकी आतापर्यंत राज्याबाहेरील 6 हजार 713 मजूर परतलेले आहेत. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मजूर आंध्रप्रदेश, तेलंगाणा व इतर राज्यात अडकलेले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून त्यांना महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आणून सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मजूर पायी स्वगावी जाण्यासाठी निघत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानंतर पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी या सर्व मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता मोफत बसेसची व्यवस्था करत असल्याचे जाहीर केले.
आंध्र प्रदेशमधून एक हजार मजुरांना घेऊन वडसा येथे रेल्वे येत आहे. त्यातील जिल्ह्यातील 7 तालुक्यामध्ये विविध ठिकाणी मजुरांना मोफत बसद्वारे पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाकडून त्यांची वैद्यकीय तपासणीही यावेळी केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. बाहेरुन आलेल्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी होणार आहे. लक्षणे नसल्यास घरीच क्वारंटाईनमध्ये राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि काही लक्षणे असतील तर मात्र संस्थात्मक क्वारंटाईनसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या तसेच शारीरिक अंतर राखण्याच्या अटीवर जिल्ह्यातील अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी तीन-चार दिवसात महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहोत. गडचिरोली शहर तसेच तालुका मुख्यालयातील बाजारपेठांमधील दुकाने सुरू करण्याबाबत चार दिवसात लेखी निर्देश देण्यात येतील, असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. अर्थव्यवस्थेची रुतलेली चाके येत्या काही दिवसात निश्चित मार्गी लावू असेही ते म्हणाले. सध्या जिल्ह्याला नवीन 5 व्हेंटिलेटर मंजूर आहेत. त्यासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करुन दिला जाईल. तसेच संबंधित 5 व्हेंटिलेटर हे चांगल्या गुणवत्तेचे व उच्च क्षमतेचे असावेत, असे त्यांनी यावेळी आरोग्य विभागाला निर्देश दिले.
तेंदुपत्ता संकलनात कोणत्याही अडचणी येऊ नयेत...
जिल्ह्यातील तेंदुपत्ता संकलन सुरू होत आहे. मजुरांसह विविध कंत्राटदारांना यासाठी प्रवास व मजुरांची ने-आण करणे आवश्यक आहे. याबाबत काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. तरी प्रशासनाने याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील मुख्य आर्थिक स्रोत हा तेंदूपत्ता असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल या व्यवसायातून होत असते. त्यामुळे तेंदुपत्ता संकलन सुव्यवस्थित होईल, याकडे प्रशासनाने लक्ष घालावे, असे ते यावेळी म्हणाले.