गडचिरोली - विधानसभा निवडणुकीमध्ये आरमोरी क्षेत्रातून उभे असलेले अपक्ष उमेदवार बग्गूजी ताडाम यांचे अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी 11 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. यातील ४ महिन्यांपासून फरार असलेले मुख्य आरोपी काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम आज (बुधवारी) स्वतः आरमोरी पोलिसांना शरण आले.
विधानसभा निवडणुकीत आरमोरी क्षेत्रातून अपक्ष उमेदवार म्हणून बग्गूजी ताडाम रिंगणात होते. मात्र, काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम यांच्यासह इतर 11 जणांनी ताडाम यांचे अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार ताडाम यांनी आरमोरी पोलिसांत केली होती. यावरून पोलिसांनी 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तेव्हा सर्वच आरोपी फरार झाले. मात्र, एक एक आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
चार महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर सोमवार ३ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास आरोपी माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, दत्तू सोमनकर, जयंत हरडे, गिरिधर तीतराम यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन स्वतः अटक करवून घेतली. पोलिसांनी तत्काळ त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले त्यानंतर जामीनवर सोडण्यात आले.