गडचिरोली : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलाचा धनादेश मंजूर करण्याकरता लाभार्थीकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरमोरी पंचायत समितीच्या अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. भुषण मुखरु किरमे (वय २७)असे अभियंत्याचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा शेतमजूर असून, त्याला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले होते. त्याविषयीची कागदपत्रे सादर करुन धनादेश मंजूर करण्याकरिता पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाचा अभियंता भूषण किरमे याने तक्रारकर्त्यास ७ हजार रुपयांची लाच मागितली. लाचेचा पहिला हप्ता म्हणून त्यास ५ हजार रुपये द्यायचे होते. तडजोडीअंती तो ४ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.
पिडीत व्यक्तीने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून भूषण किरमे यास पंचायत समितीसमोरील रस्त्यावर तक्रारकर्त्याकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गडचिरोली एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकार, किशोर ठाकूर, गणेश वासेकर, सोनी तावाडे, तुळशीराम नवघरे यांनी केली.