गडचिरोली - जिल्ह्यातील भामरगडमध्ये हेमलकसा येथे कर्मयोगी बाबा आमटे यांनी ४६ वर्षांपूर्वी २३ डिसेंबर १९७३ ला लोकबिरादरी प्रकल्प नावाचे सेवाकेंद्र सुरू केले. प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दाम्पत्याने शिक्षण, आरोग्य, शेती इत्यादींवर आदिवासी भागात राहून निस्वार्थ सेवा दिली. लोकबिरादरी प्रकल्पाचा ४६ वा वर्धापनदिन विविध विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
हेही वाचा - लोकबिरादरीची निरंतर सेवा.. आदिवासींमध्ये राहून त्यांच्यासाठी ४६ वर्षांपासून राबतेय आमटे कुटुंब
प्रकल्पातील गोटुलमध्ये दिवंगत बाबा आमटे आणि दिवंगत साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून आणि दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये मुलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. रात्री मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २३ ते २६ डिसेंबरपर्यंत लोकबिरादरी आश्रम शाळेचे स्नेहसंमेलन सुरु राहणार आहे. २४ तारखेला मिस लोकबिरादरी स्पर्धा, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, २५ तारखेला दिवसभर शैक्षणिक गंमत जत्रा, २६ तारखेला कर्मयोगी बाबा आमटे यांची १०५ वा जयंती कार्यक्रम आणि बक्षिस वितरण करून कार्यक्रमाचा समोरोप होणार आहे.
हेही वाचा - गृहमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर, नक्षल कारवायांचा घेतला आढावा
याप्रसंगी वडसाचे संवर्ग विकास अधिकारी स्वप्निल मकदुम, एटापल्लीचे सं.वि.अ गज्जलवार, भामरागडचे सं.वि.अ महेश ढोके, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे, भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी, उपसभापती प्रेमिला कुड्यामी, प्रकल्पातील जुने कार्यकर्ते मनोहर येम्पलवार, प्राचार्य डॉ. विलास तळवेकर, मुख्याध्यापक शरिफ शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.