गडचिरोली - पोलिसाचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी भटपर गावातील मुन्सी देऊ ताडो याची निर्घृण हत्या केली होती. त्याच्या हत्येचा निषेध व्यक्त करत भटपर येथील नागरिकांनी आक्रोश करत नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी नागरिकांनी जनआक्रोश रॅली काढली.
मुन्सी ताडो हा विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करत नव्हता. तर मुन्सी व त्याची पत्नी हे दोघेही नक्षल दलममध्ये कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांच्या स्थानिक आदिवासी बांधवावरील अन्याय अत्याचाराला व नक्षली जीवनाला कंटाळून ते आपल्या घरी परतले. त्यानंतर आपल्या शेतात शेतीची कामे करुन सामान्य नागरिकांचे जीवन जगू लागले. तीन मुली व एक मुलगा असा सुखी संसार त्यांनी सुरू केला. मात्र १० जुलैला सायंकाळी 6 वाजता मुन्सी शेतात गेला होता. यावेळी मुन्सीला नक्षलवाद्यांनी बळजबरीने शेताच्या बाजुच्या रस्त्यावर नेऊन गोळी मारुन त्याची हत्या केली.
यामुळे भटपर येथील जनतेत तीव्र पडसाद उमटले. भटपर येथील जनतेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता जनआक्रोश रॅली काढली. यावेळी नक्षलवाद मुर्दाबाद अशा घोषणांनी नागरिकांनी दिल्या. भटपर येतील जनतेने काढलेल्या या आक्रोश रॅलीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी भटपर येथील नागरिकांचे मनोबल वाढवले. जनतेने नक्षलींच्या भूलथापांना बळी न पडता शासनाच्या विकासाच्या प्रवाहात यावे, असे आवाहन सुरक्षा दलाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.