धुळे- दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बसविण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली. यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू जनजागृती समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करून या घटनेचा निषेध करण्यात आला.
दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटत असून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची तसेच सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसच्या एन. एस. यु. आय. या विद्यार्थी संघटनेने हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी विश्वहिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करून या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच याबाबतचे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.